भरली वांगी (सुकी)

साहित्य –
वाटणासाठी – १/२ वाटी किसलेले सुके खोबरे, २ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा.
५-६ छोटी वांगी
१ बटाटा (हवे असल्यास)
१ कांदा (मोठा) बारीक चिरुन
२ वाटी कोथिंबीर
१ चमचा हळद
२ चमचे लाल तिखट
२ चमचे गरम मसाला
मिठ, हिंग, तेल, मोहरी.
 
कृती –
वाटण – कढईमधे सुके खोबरे थोड्याशा तेलावर चांगले भाजून घेणे व बाजुला काढणे. कांदा उभा, पातळ चिरुन व लसूण पाकळ्या तेलावर खरपूस लालसर परतून घेणे. कांदा काळपट करणे पण करपवू नये. थोडा वेळ गार करुन मग मिक्सरला वाटण करुन घेणे. हे वाटण  करताना पाणी न घातल्यास जास्त दिवस फ्रिजमधे टिकते.
 
भाजी
वांगी स्वच्छ धुवून घ्यावीत. देठ थोडे तासून घ्यावेत. पूर्ण कापू नयेत. वांग्यांना खालून आडवी-उभी चिर द्यावी. + चिन्हा प्रमाणे. म्हणजे त्यात सारण नीट भरता येते. फोडी करु नयेत.
बटाटा सोलून, उभ्या फोडी करुन घेणे.
सारणसाठी बारीक चिरलेला कांदा, वाटण, कापलेली कोथिंबीर, हळद, मिठ, तिखट, गरम मसाला एकत्र करुन घेणे.
चिरलेल्या वांग्यांमधे हे सारण भरावे.
कढईमधे थोडे जास्त तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग ची फोडणी करणे. बटाटा फोडी घालणे. अलगद सारण भरलेली वांगी ठेवणे. पाव वाटीहून कमी पाणी घालणे. आणि झाकण ठेवून मंद आचेवर, झाकणावर पाणी ठेवून भाजी शिजविणे. ही सुकी भाजी असल्यामुळे पाणी घालू नये. अधे-मधे झाकण उघडून अलगद वांगी हलविणे. वाफेवर छान भाजी शिजते.
 
चपाती बरोबर तर ही भाजी छान लागतेच पण भाकरी सोबत तर मजा न्यारीच!!!

Page copy protected against web site content infringement by Copyscape